नागनाथ संतराम इनामदार Published By : mhnmk.com (⏱ 30 Jun, 2017) ना. सं. इनामदार हे मराठीतील श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार होते. इतिहासकाळातील उपेक्षित पात्रांना न्याय देणारा लेखक अशी त्यांची कायमची ओळख मराठी वाचकाला राहिलं. कादंबरीमधे काय सांगितले आहे, त्याच्याएवढेच महत्त्व ते कसे सांगितले आहे, या गोष्टीला असते. इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी कसून संशोधन, इतिहासाचे सजर्नशील आकलन, आणि प्रसंगातील नाटयमयता व चित्रदर्शी शैली, यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. त्यांच्या ऐतिहासिक कादंबरी लेखनाला महाराष्ट्रात तोड नाही. ऐतिहासिक वास्तवातून वर्तमानाचे परिक्षण करणारे, ते थोर कादंबरीकार होते. एकीकडे काय घडले याचे तपशील गोळा करणे, उपलब्ध माहितीतून जरूरी तो तपशील न मिळाल्यास, त्याविषयी बिनचूक ठोकताळे बांधणे, इतिहासाचा आदर करणे, आणि त्यानंतर पुन्हा आपल्या दृष्टिला दिसलेला, भावलेला इतिहास उभा करणे, ही दुहेरी तारेवरची कसरत ऐतिहासिक कादंबरीकाराला करावी लागते आणि इनामदारांनी ती लीलया किती सहजपणे साधली होती हे त्यांच्या लेखनातून दिसून येते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर लिहीलेली 'बंड' ही त्यांची पहिली कादंबरी, परंतु ती प्रसिध्द होण्यास मात्र १९९६ साल उजाडले. त्या समराच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यानी ती लिहीली होती. झेप ही त्यांची प्रथम प्रसिध्द झालेली, दुसरी ऐतिहासिक कादंबरी, १९६३ सालामधे प्रकाशित झाली. ज्या काळात वाढते औद्योगिकीकरण, दाबले गेलेले कामगार, बदलणारे सामाजिक आणि व्यक्तिगत वास्तव यांचे पडसाद मराठी साहित्यसृष्टित उमटत होते, त्या काळात आपली आगळी वेगळी शैली घेऊन ना. सं. इनामदार आले आणि त्यांनी मराठी वाचकांना अक्षरश: जिंकून घेतले. इतिहास पुन्हा पुन्हा तपासण्याची 'शिकस्त' केली. त्यांची ही 'झेप' मराठी वाङमय जगताला एका नव्या क्षितिजाकडे नेणारी ठरली. मराठेशाही आणि पेशवे यांच्या कालखंडातील अनेक व्यक्तींचा मागोवा त्यांनी घेतला. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टि अतिशय निकोप होती. नोकरीच्या निमित्ताने हिंडत असताना ऐतिहासिक दस्तावेजांचे संशोधन करण्याचा छंदच त्यांना लागला होता. साहित्य : •इंद्रनील (कथा संग्रह) •इनामदारी •घातचक्र (कादंबरी) •झुंज (कादंबरी) •मंत्रावेगळा (कादंबरी) •झेप (कादंबरी) •राऊ (कादंबरी) (या कादंबरीचे ’राऊ स्वामी’ या नावाचे हिंदी भाषांतर ’भारतीय ज्ञानपीठा’ने प्रसिद्ध केले आहे.) •राजेश्री (कादंबरी) •वाळल्या फुलांत (आत्मचरित्र) •शहेन शाह (कादंबरी) •शिकस्त (कादंबरी) 0 Votes have rated this Naukri. Average Rating is 0