वासुदेव गोविंद आपटे लेखक, भाषांतरकार Published By : mhnmk.com (⏱ 30 Jun, 2017) वासुदेव गोविंद आपटे (एप्रिल १२, १८७१; धरणगाव - फेब्रुवारी २, १९३०; पुणे) हे मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार होते. आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबर्यांचे अनुवादक, निबंधकार व कोशकार होत. कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण (१८९६). त्यानंतर नागपूरच्या 'हिस्लॉप' कॉलेजात एक वर्ष फेलो आणि नंतर पुण्यात काही काळ शिक्षक. पुणे मुक्कामी त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी भाषा व साहित्याची विशेष गोडी निर्माण झाली. अशोक अथवा आर्यावर्तातला पहिला चक्रवर्ती राजा याचे चरित्र (१८९९) हे आपट्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक. ते कोल्हापूरचे प्रोफेसर विजापूरकर यांच्या ग्रंथमालिकेतून प्रसिद्ध झाले.त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धर्म ह्या विषयावरील बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी १९०५ मध्ये लिहिला व १९१४ साली तो प्रसिद्ध झाला. काही काळ अलाहाबाद येथील 'मॉडर्न रिव्ह्यू"त मराठी पुस्तकांच्या परीक्षणाचे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या 'ज्ञानप्रकाशा'च्या संपादनाचे काम त्यांनी केले. १९०६ साली त्यांनी 'आनंद' हे मुलांचे मासिक सुरू केले, ते अद्यापही सुरू असावे. 'आनंद'चे संपादन व ग्रंथलेखन ह्यांच्या बरोबरीने तरुण पिढीला राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक गोष्टींचे सम्यक ज्ञान मिळावे या उद्देशाने त्यांनी विचारसाधना नावाचे वर्तमानपत्रही सुरू करून पाहिले, परंतु प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते बंद करावे लागले (१९२०). त्यांच्या एकूण लेखनापैकी सुमारे ७५ टक्के लिखाण भाषांतरित, रूपांतरित व आधारित अशा स्वरूपाचे आहे. लेखन हा व्यवसाय त्यांनी आर्थिकदृष्ट्या यशस्वी करून दाखविला. मराठी भाषेचे संप्रदाय व ह्मणी हा विषय भाषेच्या दृष्टीनें जसा महत्वाचा आहे तसा मनोरंजकही आहे. पण कोणाला ? तर ज्याचें मन भाषाविषयांत रममाण होईल त्याला. इतरांना तो रुक्षच वाटावयाचा ! यामुळें कादंबऱ्या व नाटकें यांच्या पुस्तकांना जसा लोकश्रय मिळतो, तसा प्रस्तुत पुस्तकास मिळणें शक्य नाहीं; तथापि अलीकडे कांहीं अंशीं मराठी लेखक व वक्ते यांच्या परिश्रमानें व कांहीं अंशीं एम. ए. म्याट्रिक व स्कूलफायनल या परिक्षांत मराठी भाषेचा प्रवेश झाल्याकारणानें लोकांत मराठी भाषेविषयींची आस्था उत्पन्न होऊं लागली आहे. तेव्हां प्रस्तुत विषयावर केलेल्या परिश्रमांचे पहिलें फळ महाराष्ट्रापुढें मांडण्यास सध्यांचा काळ अधिक अनुकूळ आहे असें वाटल्यावरून पंधरावर्षांपूर्वी माझ्या वडील बंधूंनीं आरंभ केलेलें हें कार्य तडीस नेऊन थोड्याशा अंशांनी तरी त्यांच्या व मातृभाषेच्या ऋणांतून मी मुक्त होत आहें याबद्दल मला समाधान वाटणें स्वाभाविक आहे. 0 Votes have rated this Naukri. Average Rating is 0